महात्मा गांधींच्या विचाराचा खून पंडित नेहरूंनीच केला – सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य

पुणे, २८ जानेवारी २०२३ : महात्मा गांधीचा खून माथेफिरु नथुराम गोडसेंनी केला. पण, महात्मा गांधींच्या विचाराचा खून पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच केला, असे धक्कादायक विधान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले आहे. जाधवर इन्स्टिट्युट आयोजित ६ व्या युवा संसदेत सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे विधान केले. दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या विधानावरुन आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. यावर कॉंग्रेस काय उत्तर देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महात्मा गांधीचा खून माथेफिरु नथुराम गोडसेंनी केला. पण, महात्मा गांधींच्या विचाराचा खून पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच केला. खेडी लुटा, असे नेहरु यांनीच सांगितले. मी परखड बोलतो. बोलावं लागेल, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे.

तसेच, यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. राजकारणात दोन वर्ग आहे एक प्रस्थापित आणि एक विस्थापित. देवेंद्र फडणवीस यांना कुणी काहीही म्हणो. त्या माणसानं ओळखलयं की प्रस्थापितांमधील विस्थापितांना आपल्यात कसे घ्यायचे. आणि त्याचमुळे मी आणि गोपीचंद पडळकर आम्ही दोघे त्यांच्यासोबत गेलो आणि आमदार झालो. प्रस्थापित राजकारणातले अलीकडच्या काळातले त्यांचं नाव मी घेणार नाही. मागच्या दाराने अनेक जणांना आमदार केले, असा खुलासाही त्यांनी केला.