सर्जनशीलतेच्या नावाखाली, शिवीगाळ आणि असभ्यपणा सहन केला जाणार नाही: अनुराग ठाकूर

मुंबई, 19 मार्च 2023: ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल. कारण या प्लॅटफॉर्मना सर्जनशीलते साठी स्वातंत्र्य देण्यात आले होते, शिवीगाळ आणि अश्लीलतेसाठी नाही. आणि जर कोणी ही मर्यादा ओलांडली, तर सर्जनशीलतेच्या नावाखाली, असभ्य शिवीगाळ स्वीकारली जाणार नाही. यावर काही कारवाई करण्याची गरज पडली तर सरकार मागे हटणार नाही” असेही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

सध्या जी प्रक्रिया सुरु आहे, त्यानुसार, आधी प्राथमिक पातळीवर, निर्मात्यांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करावे लागते. त्यांच्या वर्तनात बदल करुन, ते 90 ते 95 टक्के तक्रारी दूर करु शकतात. त्यानंतर संघटनेच्या पातळीवर देखील या तक्रारींचे निवारण केले जाते, जास्तीत जास्त तक्रारी तिथेच निरस्त केल्या जातात. आणि त्यापुढे, जेव्हा सरकारच्या पातळीवर गोष्टी होतात, तेव्हा विभागीय समितीच्या पातळीवर, त्यात कठोर कारवाईचे जे नियम आहेत, त्यानुसार आम्ही कारवाई करतो. मात्र गेल्या काही काळापासून, या तक्रारी वाढण्यास सुरुवात झाली आहे आणि आमचा विभाग अत्यंत गांभीर्याने त्याकडे बघतो आहे.आम्हाला या नियमावलीत बदल करायचं असेल, तर त्याबद्दलही आम्ही गांभीर्याने विचार करतो आहोत.