‘हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडले असते…’ खासदार उदयनराजे भोसले झाले भावुक, फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी

पुणे, २९ नोव्हेंबर २०२२ : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानजनक वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. या वेळी ‘काय दिवस आलेत, हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडले असते, असे सांगताना उदयनराजे भावुक झाले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. ‘‘राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना होत आहे. हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडले असते. काय दिवस आलेत, हेच दिवस बघायचे होते. प्रत्येक ठिकाणी राजकारण करीत राहिल्यास काय भविष्य असणार? आपल्या व्यथा सांगायच्या तरी कोणाकडे? राजकीय पक्षांनी शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवूनच पक्षाची निर्मिती केली. त्यांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करू शकत नसाल तर नाव घेण्याचा अधिकार नाही, असे खडे बोल त्यांनी पक्षातील नेत्यांना सुनावले.’’
‘‘शिवाजी महाराजांचे विचार न स्वीकारल्यास भारत महासत्ता होणे तर सोडा, देशाचे तुकडे होतील. तुम्हाला काहीच वाटत नसेल तर कशाला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची? कशाला त्यांचे पुतळे उभे करायचे? असा उदिग्न सवालही त्यांनी केला. मला खासदारकी दुय्यम आहे. वेळ येवू द्या, मी दाखवून देईन, असा इशाराही त्यांनी दिला.
——–
रायगडावर प्रतिकात्मक आक्रोश
शिवाजी महाराजांचे विकृतीकरण न थांबवल्यास उद्याच्या पिढीसमोर मोडतोड केलेला इतिहास जाईल. राष्ट्रदोहाच्या कायद्यात महापुरुषांचा अवमान याचाही समावेश करावा. येत्या तीन डिसेंबरला रायगडावर प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत. तसेच, राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री यांचीही भेट घेणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.