“अजित दादा तुम्ही योग्य जागी, पण यायला उशिर केला” – केंद्रीय अमित शाह यांनी केल् उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतूक

पुणे, ६ आॅगस्ट २०२३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी भाष्य केले. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आज पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. “अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे विधान अमित शाह यांनी केले.

 

पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ संकल्पनेवर आधारित सहकार चळवळीला बळकट करणारे अनेक कार्यक्रम घेतले आहेत. त्याचाच हा एक भाग आहे.

अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात करताच अजितदादांचा उल्लेख करून त्यांनी इथे (भाजपासमवेत) याला उशीर केला असल्याची टिप्पणी केली. तसेच तुम्ही आता योग्य ठिकाणी येऊन बसला आहात, असे सांगितले. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तर अजित पवार यांनी आपल्या जागेवरून हात जोडून अमित शाह यांना अभिवादन केले.