शिंदेचा आमदार म्हणतो, मोदी पंतप्रधान झाले नाही तर फाशी घेणार

जालना, ११ जानेवारी २०२४ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार संतोष बांगर विविध कारणांमुळे प्रसिद्धीझोतात असतात. आता संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन, असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असून त्यांना बहुसंख्य आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे, असा महत्वपूर्ण निकाल बुधवारी ( १० जानेवारी ) राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालानंतर संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला. तेव्हा बांगर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संतोष बांगर म्हणाले, “अपात्रता आणि शिवसेनेचा निकाल आमच्या बाजूनं लागणार, हे छातीठोकपणे सांगितलं होतं. तसेच, छातीठोकपणे सांगतो की, एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत.”
“उद्धव ठाकरेंना आजूबाजूची लोक सुधारू देत नाहीत. उद्धव ठाकरेंनी या लोकांना बाजूला केलं पाहिजे. संजय राऊत कोण आहे? संजय राऊतांनी सगळा सत्यानाश केला आहे. राऊतांनी शिवसेनेला शरद पवारांच्या दावणीला नेऊन बांधली आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी विचारांचे असून त्यांनी आमच्या पक्षात यावं. शिवसेनेला पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाही,” असंही संतोष बांगरांनी म्हटलं आहे.