कोपरगाव येथे भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
नगर, १६ ऑगस्ट २०२३: नगरच्या कोपरगाव मतदारसंघामध्ये सत्तापक्षातले दोन गट आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळाचं वातावरण निर्माण केलं होतं. भूमिपूजनाच्या फलकावरुन कोपरगावमध्ये आज राडा झाला अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे आणि भाजप युवा नेते विवेक कोल्हे आमने-सामने आले होते.
यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. आशुतोष काळे समर्थक आणि विवेक कोल्हे समर्थक एकमेकांसमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
राज्याच्या राजकारणामध्ये सध्या विचित्र परिस्थिती आहे. सत्तापक्षामध्ये भाजप, राष्ट्रवादीचा एक गट आणि शिवसेनेचा एक गट सहभागी आहे. सत्तेत इतर पक्ष सहभागी झाल्याने मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कुरबूर सुरु आहे. अनेक मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार, हे मात्र नक्की.
कोपरगावमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये कुरबूर सुरु झालेली आहे. आजच्या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला असून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आरडाओरड करत घोषणाबाजी करत असल्याचं दिसून येत आहे.