शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले; समर्थक म्हणाले, बंडखोरांची खैर नाही
नाशिक, ८ जुलै २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार पावसात भिजले की जे करिष्मा करतात हे २०१९ च्या निवडणुकीत दाखवून दिले. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर आता नाशिक दौऱ्यावर असलेल्या पवारांनी थेट पावसात नागरिकांशी संवाद साधला. त्यांमुळे ते पावसात भिजल्याने त्यांच्या समर्थकांकडून त्याचा फोटो व्हायरल करत आता बंडखोरांची खैर नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ…शीशे से कब तक तोड़ोगे…मिटने वाला मैं नाम नहीं…तुम मुझको कब तक रोकोगे…
असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी करत पवार यांना सलाम केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी साताऱ्यात कोसळत्या पावसात घेतलेली ती सभा खूप गाजली होती. शरद पवारांचं पावसात भीजत केलेलं ते भाषण ऐतिहासीक ठरलं. त्या एका सभेने राज्यातील सगळं सत्ताकारण बदलून टाकलं होतं. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार पुन्हा पावसात भिजले आहेत.
राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असताना शरद पवार पुन्हा एकदा अॅक्शन मोडवरती आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खादार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा पावसात भिजल्याचा फोटो शेअर केला आहे.
अजित पवारांनी बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतर शरद पवारांनी मी न्यायालयीन लढाई लढणार नाही तर जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली. शरद पवारांनी महाराष्ट्रात सर्व बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज शरद पवारांची बंडखोर आमदार छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात येवला येथे पहिली जाहीर सभा होत आहे.
या सभेला जात असताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे जागोजागी जंगी स्वागत केले. दरम्यान शरद पवार येवल्याच्या दिशेने जात असताना ते पावसात भिजल्याचे पाहायला मिळालं. मागच्या वेळी शरद पवार जेव्हा पावसात भिजले होते तेव्हा त्याचा परिणाम राज्यातील राजकारणात पाहायला मिळाला होता. आता शरद पवार पुन्हा एकदा पक्ष उभारणीसाठी राज्य पिंजून काढताना पावसात भिजले आहेत. याचा राजकिय लढाईत काय परिणाम होतो हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.