वय आता ८२ झालं, ८३ झालं तरीही हट्ट का? अजित पवारांनी थेट शरद पवारांना प्रश्न

मुंबई, ५ जुलै २०२३: मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत पण शरद पवार हे माझं दैवत आहेत. पण तुम्हीच मला सांगा एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर ५८ व्या वर्षी रिटायर्ड होतो. राजकारणात असेल तर भाजपात ७५ व्या वर्षी रिटायर्ड केलं जातं. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी ही उदाहरणं आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज अजित पवार हे शरद पवारांच्या निवृत्तीबद्दलच बोलले आहेत.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या गटाच्या बैठकीत ते बोलत होते त्यापूर्वी छगन भुजबळ प्रफुल पटेल धनंजय मुंडे यांनी देखील त्यांचा मनोगत व्यक्त करत अजित पवारांच्या निर्णयाची पाठराखण केली

अजित पवार म्हणाले, ठरावीक काळाने नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते यशवंत राव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं.

मला हे सांगण्यात आलं की मी राजीनामा देतो, संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सांगितलं त्यालाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडलं कुणास ठाऊक? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? मला महाराष्ट्राने सांगावं की आमच्यात धमक आहे की नाही? जे प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव शेवटी का होईना येतं ना? मग मला का आशीर्वाद का दिला जात नाही. शेतकरीही ६० वर्षांचा झाला की २५ वर्षांच्या मुलाला सांगितलं जातं आता शेती तू बघायची आणि आम्ही तुला सल्ला देऊ.

मी सुप्रियाला विचारलं हा नेमका कुठला हट्ट?

मी सुप्रियाशीही बोललो, सुप्रिया आपण एका घरातले, एका कुटुंबातले आहोत काहीतरी सांग. त्यावर सुप्रिया म्हणाली ते हट्टी आहेत. हा नेमका कसला हट्ट आहे? शरद पवारांविषयी आम्हाला खूप आदर आहे. आत्ता सांगितलं की काही काही आमदारांना बोलवलं जातं. ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नींना फोन केला जातो भावनिक केलं जातं. मी नाव घेत नाही वरिष्ठ नेत्याने एका आमदाराला सांगितलं की का तिकडे जातो. त्याने हात जोडून सांगितलं आम्ही दादांना शब्द दिला आहे.

आमदार मला सांगत होते दादा तुम्ही..

अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे काहीतरी करा, २०१९ चं आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही आता काही पावलं उचलली तर आम्ही तुम्हाला साथ देऊ. आज नरेंद्र मोदींचा करीश्मा देशात आहे. २०१४ च्या निवडणुकीत एकट्या नरेंद्र मोदींकडे पाहून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भाजपा सत्तेवर आला आहे. २०१९ ला पुन्हा त्यांना निर्विवाद बहुमत मिळालं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप