संजय राऊत यांना धमकी देणारा कार्यकर्ता निघाला त्यांचाच निकटवर्तीय

मुंबई, १५ जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांना देखील धमकी देणारा फोन कॉल आलेला होता. त्यावरून महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली होती. आता मात्र संजय राऊत यांना धमकी देणारा आरोपी हा राऊत यांच्या बंधू सुनील राऊत यांचा जवळचाच कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. राऊत यांनी सुरक्षा वाढून घेण्यासाठी हा धमकीन कॉलचा बनाव केल्याचा आरोप भाजप व मनसेने केल्याने राव त्यांची चांगलीच पंचायत झाली आहे.
मयुर शिंदे असं या अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. परंतु हा मयुर शिंदे संजय राऊतांचा निकटवर्तीय असून राऊतांच्याच सांगण्यावरून त्याने हे धमकीचं नाटक केलं असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीने केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हे महाशय (मयुर शिंदे) सध्या भाजपा किंवा मिन्धे गटात असल्याचे समजले. कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो. एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीस पकडून शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला तसा. राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवले काय? काही विषय संवेदनशील असतात. याचे भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात.

मयुर शिंदे हा संजय राऊत आणि सुनील राऊतांचा निकटवर्तीय असून राऊतांच्या सांगण्यावरूनच त्याने संजय राऊत आणि सुनील राऊतांना फोन करून धमकी दिली होती. असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अधिक सुरक्षा मिळावी आणि लवाजमा वाढवा, यासाठी राऊत यांनी हा खोटारडेपडणा केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. तसेच सोशल मीडियावर राऊत आणि मयुर शिंदे यांचे एकत्र असलेले फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

संदीप देशपांडे काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित करताना म्हणाले होते की, तुम्ही (राऊत) तुमच्याच माणसाला सांगताय की, मला धमकीचे फोन कर. तो माणूस फोन करून शिव्या घालण्याचं नाटक करतोय. त्याला सुनील राऊत शिव्या घालून उत्तर देत आहेत. मुळात यांचे गँगस्टर (माफिया/डॉन) लोकांशी कशा पद्धतीचे संबंध आहेत ते यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.