पटोले, राऊत बोल घेवडे
अहमदनगर, २६ मे २०२३ ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आमच्यावर वारंवार टीका करतात, आम्ही त्यांना उत्तर देण्यास बांधिल नाही. ते केवळ माध्यमांना काम मिळावे यासाठी बोलत असतात, अशी टीका उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी (२६ मे) अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नुकतेच नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ झाल्यावर हे सरकार पडेल, असा मोठा दावा केला. यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. माध्यमांना काम मिळावं म्हणून ते बोलतात. आम्हाला खूप कामं आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना उत्तरं देत नाही.” यावेळी फडणवीसांनी आमच्या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असंही नमूद केलं.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. त्यात शिंदे गट २२ जागांवर दावा करेल, असं खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, “आमच्याकडे कोणतीही अडचण नाही. आम्ही खूप समन्वय ठेऊन काम करतो. शिवसेना-भाजपा युतीत समन्वयाने काम होईल. आमच्या सर्व गोष्टी निश्चित होतील तेव्हा माध्यमांना याची माहिती देऊ.”
विशेष म्हणजे पत्रकारांनी संजय राऊत खोक्यांवर एक पुस्तक लिहिणार आहेत असं म्हटल्याचं लक्षात आणून देत फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी तीन वेळा कोण संजय राऊत म्हणत प्रत्युत्तर दिलं.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप