शरद पवार पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि उमेदवार जाहीर केला

पंढरपूर, ७ मे २०२३ : राजीनामा नाट्य संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे दौरे सुरू केले आहेत. शरद पवार यांनी आज पंढरपूर मध्ये श्री पांडुरंग मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले पंढरपूर मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून एका कार्यकर्तेचे नाव जाहीर करून टाकले आणि भाकरी देखील फिरवली.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांच्या मनातील इच्छा हेरत शरद पवारांनी साखर कारखान्याच्या जाहीर कार्यक्रमातच पाटीलच उमेदवार असतील, असं भाष्य केलं.

शरद पवार म्हणाले, ‘आज तुम्ही अभिजीतला याठिकाणी साथ दिली. नेतृत्व हे तयार करायचं. तुम्ही लोकांनी हे नेतृत्व तयार केलं. तुम्ही नेतृत्व दिल्यानंतर आमच्यासारख्या नेत्याची जबाबदारी आहे की, त्या नेतृत्वाच्या पाठिशी उभं राहायचं. पाठिशी उभं राहायचं नुसतं नाही, तर मला भालके दादांच्यानंतर हा तालुका राजकीयदृष्ट्या पोरका वाटतो. त्याचं हे पोरकेपण घालवण्याची ताकद आज अभिजीतमध्ये आहे. त्यासाठी अभिजीतला तुम्ही पूर्ण ताकदीने उभं करा’, असं आवाहन पवारांनी केलं.

पवार म्हणाले, ‘मी तुम्हाला एवढंच सांगतो की, ज्यावेळी निवडून येईल, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांचा, आमच्या सगळ्या महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार हा या ठिकाणी कोण आहे, असा प्रश्न विचारला तर लोक अभिजीतचं नाव घेतील. यादृष्टीने तयारी करा.

दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अभिजीत पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांपासूनच तयारी सुरू केली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पाटलांनी साखर पेरणी सुरू केली असून, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी करून 2024 च्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे.