शरद पवार यांनी राजीनामा मागे घेताच अजित पवारांचे राज्यात दौरे
मुंबई, ५ मे २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर दिवसभर अजित पवार हे प्रसारमाध्यमांच्या समोर आलेले नाहीत त्यामुळे अजित पवार कोठे आहेत अशी चर्चा माध्यमांमध्ये व सोशल मीडियामध्ये रंगलेली आहे तसेच अजित पवार दिल्लीला गेल्याचे समोर येताच त्यावरही तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यावर अजित पवार यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिले असून शरद पवारांच्या निर्णयाचे अजित पवार यांनी स्वागत केले आहे ते शनिवारपासून पुणे सातारा धाराशिव लातूर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत असे देखील स्पष्ट केलेले आहे.
शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल,” असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशीरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्या ६ तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. ७ तारखेला बारामती, ८ तारखेला कोरेगाव, सातारा, ९ तारखेला सातारा, फलटण. १० तारखेला उस्मानाबाद, लातूर, ११ तारखेला नाशिक आणि १२ तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप