अजित पवार यांच्या बंडखोरीचा पिक्चर अजून शिल्लक – गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य
मुंबई, १९ एप्रिल २०२३: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर तुर्त पडदा पडलेला आहे. त्यावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी ही भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट होती अशी टीका केलेली असताना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मात्र ‘पिक्चर अभी बाकी है’ असे वक्तव्य करून प्रवेशाची वेळ लवकरच जवळ येईल असे भाग किती व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नाराजीनाट्यावरून मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांसह भाजपा पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. जिवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
अजित पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली असली तरी लवकरच महाराष्ट्रात सत्तांतर घडू शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय महाभूकंपाबाबत गुलाबराव पाटलांनी मोठं विधान केलं आहे.
पाटील म्हणाले, “मला वाटतं अजून तिथी जवळ आली नाही. गुणही जुळत नाहीयेत. त्यामुळे कोणती पूजा करावी लागेल? हे एखाद्या ब्राह्मणाला विचारायला लागेल. पण ती वेळ नक्की येईल, काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.
अजित पवारांचा भाजपाला पाठिंबा देण्याचा मुहूर्त खरंच जवळ आला आहे का? असं विचारलं असता गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “ही वेळही लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राह्मणाचं म्हणणं आहे, अशी मिश्किल टिप्पणीही गुलाबराव पाटलांनी केली. “याला अजून किती दिवस लागतील, हे ब्राह्मणाला विचारावं लागेल. कारण वरचा ब्राह्मण फार कठीण आहे,” असंही ते म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप