पुणे महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार: महादेव जानकर
पुणे, 14 फेब्रुवारी २०२३: आमची भाजप सोबत युती ही विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांसाठी आहे. मी जेव्हा मंत्री होतो, तेव्हा भाजपच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढून जिंकल्या आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रासप स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व मित्र पक्षाचे कसबा पेठ पोटनिवडणुकीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख अजय भोसले आदींसह भाजप व रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आल्यापासून भाजप आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे का ? या प्रश्नावर उत्तर देताना जानकर यांनी पडळकर भाजपचा कार्यकर्त्या आहे आणि मी रासपचा राष्ट्रीय नेता आहे. महाराष्ट्र गुजरातसह विविध राज्यात माझ्या पक्षाची ताकत आहे. आजवर माझ्या पक्षाचे चार आमदार निवडून आले आहेत. पक्ष वाढवण्यासाठी मी ४० वर्षे घरी गेलो नाही.
पुन्हा भाजप व शिंदे गटाची सत्ता आल्याने तुम्ही मंत्रीपदाची मागणी करणार का ? या प्रश्नावर जानकर म्हणाले, मी मागणार नाही, मी मागणारा नाही तर देणारा नेता आहे. गरज वाटली तर भाजप मला राज्यात मंत्रीपद देईल, नाही दिले तरीही मी युती धर्म पाळणार आहे. युतीधर्म पाळण्यासाठी मी माझी टीम घेवून कसब्यातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयासाठी पुण्यात आलो आहे. रासने व भाजपने मला बातामती लोकसभेच्या निवडणुकीत खडकवासल्यात चांगली मदत केली आहे. त्यामुळे रासने यांच्या विजयासाठी आम्ही आमची ताकत त्यांच्या मागे उभी करत आहोत.
आगामी लोकसभा निवडणुक बारामती लोकसभा मतदार संघातून लढणार अहात का ? या प्रश्नावर जानकर यांनी स्पष्ट उत्तर न देता, नंतर भूमीका जाहीर करू असे सांगितले. तसेच अहमदनगरचे नाव अहिल्यानंतर असे करण्यास सर्वांची सहमती आहे. या नामांतरास विखे पाटील विरोध केला नसल्याचेही जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
पहाटेच्या शपथविधीची माहिती नाही
पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्या सहमतीने झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. यासंदर्भात आपणास काही कल्पना होती का ? प्रश्नावर जानकर म्हणाले, शरद पवार व देवेंद्र फडणवीस हे मोठ्या उंचीचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. त्यांच्याऐवढ्या उंचीवर मी जेव्हा पोहचेन तेव्हा बोलेन. पहाटेच्या शपथविधीबद्दल मला काहीही माहिती नाही, मी त्या प्रक्रीयेत कुठेही नव्हतो, असेही ते म्हणाले.