मविआच्या नेत्यांनो जाण ठेवा, निवडणूक बिनविरोध करा – राज ठाकरे यांचे पत्र

पुणे, ५ फेब्रुवारी २०२३ : कसबा आणि चिंचवड मतदार संघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. भाजपने दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. असे असताना राज ठाकरे यांनी एक पत्र जाहीर करून त्यामध्ये भाजपने व शिंदे गटाने अंधेरी ची निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याची जाणीव ठेवून कसब्याची आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करा असे आवाहन केले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे. त्याबाबत पक्षाचा एक मेळावा देखील झाला असून, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार निवडणूक लढण्याचा विचार केला जाईल असे नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता राज ठाकरे यांच्या पत्रामुळे मनसेला निवडणूक लढवता येणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.

राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला
नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला
तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवूनदेण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात
ही इच्छा.