राहुल गांधींच्या सभेत ‘खळखट्याक’ करण्यासाठी गेलेले मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

बुलढाणा, १८ नोव्हेंबर २०२२ : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याबाबतची कागदपत्रेही त्यांनी पत्रकारांना दाखवली. आपण वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या भूमिकेच्या विरोधात राज्यात पडसाद उमटत आहेत. नाशिक, ठाणे, पुणे हे आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भारत जोडो यात्रे दरम्यान आज (शुक्रवारी) शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा होत आहे, या सभेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल (शुक्रवारी) दिला आहे. राहुल गांधींच्या विरोधात मनसे स्टाईलने ‘खळखट्याक’होण्यास सुरवात झाली आहे. मनसैनिक आज मोठ्या संख्येने शेगावात दाखल होत आहेत. “शेगावात जाऊन राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवा,” असे राज ठाकरे म्हणाले होते.

शेगाव येत असलेले मनसेचे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांना पोलिसांनी दुपारी दोन वाजता चिखली (बुलढाणा) येथे अडवले. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरवात केली आहे. नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, प्रकाश महाजन, संदीप देशपांडेसह अनेक मनसैनिकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ‘नोटिस न देता आमच्यावर कारवाई केली,’ असे मनसे नेत्यांनी सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी उपस्थित होते.

जयराम रमेश म्हणाले, “भारत जोडो यात्रा ही वर्तमान, भविष्यातील मुद्यांसाठी आहे. यात सावरकरांचा मुद्या काढू नका. देशाच्या इतिहासाबाबत आपण नंतर बोलू. भारत जोडो यात्रेत आर्थिक विषमता, हुकुमशाहीला विरोध, राज्य घटना वाचविण्यासाठी प्रयत्न यासाठी जनतेशी संवाद साधण्यात येत आहेत, त्यामुळे आता ‘सावरकर छोडो-भारत जोडो,’ असे म्हणत जयराम रमेश यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.

“राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा कोणीही रोखू शकत नाही. ज्यांना काळे झेंडे दाखवायचे आहे त्यांनी ते दाखवावे, इतिहासाबाबत आज चर्चा करु नका,” असे जयराम रमेश म्हणाले.