भय, द्वेष निर्माण करणारे देशभक्त कसे?; राहुल गांधी यांचा भाजप, रा. स्व. संघाला सवाल भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये
देगलुर, 9 नोव्हेंबर 2022: एकाच देशामध्ये गुण्यागोविंदाने राहणाऱ्या जाती-धर्मामध्ये द्वेष आणि भय निर्माण करणारे तुम्ही कोणत्या देशाचे देशभक्त आहात, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केला. भारत हा देश बंधुभाव जपणारा, एकतेची भावना जोपासणारा. या देशाचे भाजप व संघ देशभक्त असूच शकत नाहीत, असा जोरदार हल्ला त्यांनी चढविला. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेची सांगता भोपळ गाव येथे छोटेखानी सभेने झाली. नोटाबंदी आणि जीएसटीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांपूर्वी याबाबत घोषणा केली. त्या वेळी काळय़ा पैशाविरुद्धची ही लढाई आहे, असे त्यांनी म्हटले होते, मात्र ते साफ खोटे होते. नोटाबंदीने या देशातील लहान व्यापारी, शेतकरी त्यांनी उद्ध्वस्त केला. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहानछोटय़ा उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयांनी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढविला.
देशात द्वेष पसरवण्याचे काम भाजप व संघाकडून केले जात आहे. जाती-धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. आपल्याच देशातील जाती-धर्माच्या लोकांमध्ये भांडणे लावणारे भाजपवाले कोणत्या देशाचे देशभक्त आहेत, असा सवाल विचारत हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समाचार घेतला.