दिशा सॅलियन खून प्रकरणात आदित्य ठाकरे…..राणेंचा गंभीर आरोप

मुंबई, ७ आॅक्टोबर २०२२: मॉडेल दिशा सॅलियन (Model Disha Salian) खून प्रकरणात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा संबंध असल्याचे बोलले जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज केले.आता ठाकरेंचे सरकार नाही. आमचे सरकार आहे. त्यामुळे आता चौकशी होणारच असा इशाराही राणे यांनी दिला.

या प्रकरणात यापूर्वी मी थेट नाव घेतले नव्हते. मात्र, आज थेट नाव घेत आहे. या प्रकरणाची सर्वजण चर्चा करीत आहेत. खासगीत अनेकजण बोलत असून आता या प्रकरणाची चौकशी केल्यास सर्वकाही बाहेर येईल, असे राणे यांनी सांगितले. मॉडेल दिशा सॅलियान प्रकरणात राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्याकडून गेल्या एक-दीड वर्षभरापासून अप्रत्यक्षपणे वारंवार आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात येत होते. मात्र, आज प्रथमच राणे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जाहीरपणे घेतले आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मला मारण्यासाठी छोटा शकील व राजन टोळीला उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिल्याचा आणखी एक गंभीर आरोप राणे यांनी केला.याला मारायला लाव. त्याचे घर जाळ या पलिकडे उद्धव ठाकरे यांनी काहीही केलेले नाही. हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंचे योगदान काय असा प्रश्‍न राणे यांनी केली.

शिवाजी पार्कवर झालेली सभा म्हणजे केवळ शिमगा आणि तमासगिरांचा मेळावा होता, अशी टीका राणे यांनी केली. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र, दीड वर्षाच्या मुलाबद्दल बोलताना ठाकरे यांना लाज वाटायला हवी, या शब्दात राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. इतक्या लहान मुलाला राजकारणात ओढणाऱ्या ठाकरे यांची पात्रता लक्षात येते, असे ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारख्या नेत्यांवर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. ज्यांनी अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अडीच तासदेखील काम केले नाही, त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका करणे शोभत नाही, अशी टीका राणे यांनी केली. या पुढच्या काळात अशी टीका आम्ही सहन करणार नाही. ते असेच बोलत राहिले तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा राणे यांनी दिला.