ठाकूर म्हणाले, तावडेंना सोडून दिलं
वसई, १९ नोव्हेंबर २०२४ ः विनोद तावडेंवर बविआने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. यामुळे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये राडा सुरु आहे. या प्रकरणी विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद सुरु केली होती. मात्र ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने पत्रकार परिषद घेता येणार नाही असं सांगण्यात आलं. यानंतर आता विनोद तावडेंना आम्ही सोडून दिलं, त्यांच्याकडे बोलायला आहेच काय? असं म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी नवा आरोप केला आहे.
विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली. सध्या पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. विनोद तावडेंनी सदरचे आरोप फेटाळले आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी नवे आरोप केले आहेत.
हितेंद्र ठाकूर म्हणाले, “विनोद तावडे यांच्याकडे बोलायला काही आहे का? पैसे वाटप किंवा मिटिंग करायची असते का? पोलिसांनी आमची पत्रकार परिषद थांबवली आहे. कारण निवडणूक आयोगाने सांगितलं, आता हे सगळं अडचणीत येईल भाजपाच्या त्यामुळे सांगण्यात आलं की आचारसंहिता असल्याने पत्रकार परिषद घेता येणार नाही. हे कुठल्या आचारसंहितेत लिहिलं आहे. उलट माध्यमांनी याचा निषेध नोंदवला पाहिजे.
हितेंद्र ठाकूर पुढे म्हणाले, “डीसीपी मॅडम म्हणाल्या की पत्रकार परिषद थांबवा आम्ही थांबवली. माझ्यावर कुठलाही दबाव वगैरे काहीही नाही. काही प्रश्नच येत नाही. कुणाच्या बापाचं प्रेशर मी घेत नाही. पैसे मोठ्या प्रमाणावर आहेत. मला त्यांनी ५० फोन केले, आता आहे ते मिटवा, आपण मित्र आहेत. जाऊ द्या विनोद तावडेंना सोडून दिलं. एका खोलीत १० लाख, कुठे दोन लाख, कुठे पाच लाख असे पैसे मिळाले आहेत. कुठे किती पैसे मिळाले ते पोलिसांना विचारा. पैसे काय माझे होते का? मतदानाच्या ४८ तास आधी सगळ्या नेत्यांनी बाहेर जायचं असतं. विनोद तावडे इकडे आले कसे? आमचे आरोप विनोद तावडे सहन करु शकत नाही. त्यामुळे ती पत्रकार परिषद थांबवली.” असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले.