जितेंद्र आव्हांना स्टंट पडला महागात मनुस्मृतीऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटा फाडला

महाड, २९ मे २०२४ ः राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यभरातून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या ठिकाणी जात मनुस्मृती दहन करत निषेध नोंदवला. यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलं गेलं, यामुळे राज्यभरातून आव्हाडांवर टीका होत आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण देताना महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेत आज (२८ मे) महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. आव्हाड यांनी आज त्याची पुनरावृत्ती केली.

मात्र, त्याच वेळी त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. उत्साहाच्या भरात त्यांनी हा फोटो मनुस्मृती समजून बाबासाहेबांचाच फोटो फाडला. एका कार्यकर्त्यांने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यावर आव्हाड यांनी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याला अपयश आले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘आम्ही महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी आलो होतो. कारण ज्या मनुस्मृतीमधे महिलांच्या संदर्भात अत्यंत खालच्या भाषेत लिहण्यात आलं आहे, त्या मनुस्मृती मधील श्लोक जर पाठ्यपुस्तकात येत असेल तर आम्ही त्याचा विरोध करत असताना अनावधानाने माझ्याकडून आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आले. त्यासंदर्भात मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो आणि मी कधी माझ्या भूमिके पासून मागे हटत नाही पण आता मी माफी मागत आहेत त्यामुळे यामागची भावना आपण समजू शकता, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. ‘‘जाहीर निषेध !जाहीर निषेध! स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.