भाजपकडून आमच्या आमदारांना २० कोटींची ऑफर’; ‘आप’ खासदार संजय सिंह यांचा दावा

दिल्ली, 24/08/2023- आम आदमी पक्षाकडून पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ’केंद्रांतील मोदी सरकार काहीही करून दिल्लीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आमच्या आमदारांवर दबाव आणल्या जात आहे’, असा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे.

 

राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ’पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा वापरकरून आम आदमी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ‘आप’च्या आमदारांना फोडून भाजपाने मनीष सिसोदिया यांचा एकनाथ शिंदे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही.’आमच्या आमदारांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक आमदारांना २० कोटींची ऑफर देण्यात येत आहे. हे २० कोटी घ्या, अन्यथा मनिष सिसोदियांसारखा सीबीआय कारवाईचा सामना करा, अशी धमकी देण्यात येत आहे. ‘आप’चे आमदार अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार, यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी संपर्क साधला आहे, असा आरोपही सिंह यांनी केला.