संभाजी ब्रिगेड सोबत आली आता बजरंग दल आणि संघही सोबत येणार -उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

मुंबई, २९ आॅगस्ट २०२२: हिंगोलीतील अनेक मातब्बरांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडनंतर आता संघ परिवारातील लोकही शिवसेनेत येत असल्याचं वक्तव्य केलं. तसेच सर्वसामान्यपणे सत्ताधारी पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. मात्र, आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे, असंही नमूद केलं. ते सोमवारी (२९ ऑगस्ट) मुंबईत मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने युती केली. आज संघ परिवारातील लोक शिवसेना परिवारात आले आहेत. हिंगोलीतील मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता हे रोजच चालू आहे. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आश्चर्यदेखील वाटतं. सर्वसामान्यपणे सत्ताधारी पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. मात्र, आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे. महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही. याची प्रचिती दाखवत ही मंडळी शिवसेनेत येत आहे.”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली.

“भाजपाने आम्ही हिंदुत्व सोडल्याची आवई उठवली होती. त्याला छेद देणाऱ्या या पक्षप्रवेशाच्या घटना आहे. बहुजन, वंचितांसह मुस्लीम बांधव देखील शिवेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात एक वेगळं चित्र निर्माण होत आहे आणि हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

 

“अनेक विषय आहेत. त्यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. तुर्त ज्यांना ज्यांना हिंदूत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपण फसले गेलो आहोत असं वाटतं त्यांना मातोश्रीचे म्हणजे शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी केवळ शिवसेनेले भक्कम करण्यासाठी नाही, तर शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी एकत्र यावं,” असं आवाहनही ठाकरेंनी यावेळी केलं.