लोकसभेच्या उमेदवारीमुळे रविंद्र धंगेकरांची दिल्लीवारी : काँग्रेसमध्ये खळबळ, भाजपमद्ये चिंता

पुणे, १७ जानेवारी २०२४ ः कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार भाजपच्या हेमंत रासणे यांचा १० हजार मतांनी पराभव करत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी इथून विजय मिळविला. हेच धंगेकर आता पुणे लोकसभेची उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. एक तगडा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असताना काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये चलबिचल तर वाढली आहे. पण भाजपसमोर दमदार उमेदवार येण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे.

काँग्रेसने काही दिवसांपूर्वी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले होते. त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे अशा अनेक बड्या नेत्यांचे 20 अर्ज आले आहेत. हे सगळे तयारी करत असतानाच आणि उमेदवारीसाठी राज्यातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या असताना धंगेकर यांनी मात्र थेट दिल्ली गाठली. त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून ते अन्य महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटींच्या माध्यमातून धंगेकरांनी पुणे लोकसभेसाठी फिल्डिंग तर लावलीच शिवाय पक्षातील इच्छुकांनाही धक्का दिला. धंगेकरांनी या भेटीतून तिसरा मेसेज दिला तो भाजपला. धंगेकर उमेदवार असल्यास निवडणुकीची लढाई कठीण होण्याच्या भीतीने भाजपमध्ये धाकधूक वाढली आहे. यातूनच धंगेकरांना उमेदवारी देऊन काँग्रेसने कसब्याची पुनरावृत्ती करण्याचा डावपेच आखल्यास काय करायचे, याबाबत भाजपमध्ये चिंता आणि चिंतन सुरू झाले आहे. धंगेकरांच्या उमेदवारीने भाजपपुढील उमेदवार निवडीचे आव्हान वाढणार आहे.

भाजपकडून सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर यांच्यासह माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे पुणे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. देवधर यांना उमेदवारी दिली आणि धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असतील, तर पुन्हा एकदा कसब्याची पुनरावृत्ती होण्याची भीती भाजपला आहे. कारण देवधर यांच्यापेक्षा मतदारांना धंगेकर हे जास्त परिचित आहेत. त्यामुळे भाजपवर दुसरा पर्याय शोधण्याची वेळ येण्याची चर्चा सुरू झाली आहे. कसब्याप्रमाणे ब्राह्मण- ब्राह्मणेतर असा प्रचार झाल्यास दगाफटका होण्याची शक्यता असल्याने भाजपने सावध पवित्रा स्वीकारला आहे.

धंगेकर यांनीही हिंदू-ब्राह्मण अशा टींकावर मात करण्यासाठी आणि मतदारांनाही आपले करण्यासाठी नवीन खेळी सुरू केली आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले असताना धंगेकर यांनी मात्र ‘जय श्रीरामा’ चा नारा दिला आहे. ‘आपल्या प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा लावूया, आनंदोत्सव साजरा करूया अशी घोषणा देत त्यांनी मतदारांना दिवे वाटप सुरू केले आहे. त्यामुळे यांच्या या उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे. यातून भाजपच्या मतदारांची सहानूभूती मिळविण्याचा प्रयत्न आमदार धंगेकर करत असावेत असा अंदाज आहे, त्यामुळे भाजपपुढेही धंगेकरांना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे, तुम्हाला धंगेकरांच्या उमेदवारीबाबत काय वाटते?

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप