काँग्रेसकडून अखेर रवींद्र धंगेकर लोकसभेच्या रिंगणात

पुणे, २१ मार्च २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवार कोण असणार याची उत्सुकता निर्माण झालेली होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपने काँग्रेसचा दारुण पराभव केल्यानंतर आता तिसऱ्यांदा ही तशी स्थिती उद्भवू नये यासाठी काँग्रेस नेतृत्वाने नवीन उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा पोट निवडणुकीमध्ये भाजपला धोबीपछाड देणाऱ्या आमदार रवींद्र धंगेकर यांच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारा पदाची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्या तुल्यबळ लढत दिसून येण्याची शक्यता आहे.

काँग्रेस तर्फे आज महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे.
पुण्यातून काँग्रेस तर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भली मोठी रांग होती. धंगेकर यांच्यासह माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, आबा बागूल, अभय छाजेड यांच्यासह वीसजण इच्छुक होते. शहर कॉंग्रेसकडून सर्व इच्छुकांची नावे प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्यात आली होती. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, आबा बागुल जोरदार रस्सीखेच सुरू होती.
मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस तर्फे शहरात करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात मोहन जोशी हे मागे पडले आणि रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा जास्त असल्याचे दिसून आल. त्यामुळे या स्पर्धेत उमेदवारी मिळविण्यात धंगेकर यांना अखेर यश आले.

कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून धंगेकर यांना संधी देण्यात आली. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणारा कसबा मतदार संघ धंगेकर या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्याकडे खेचून आणण्यात कॉंग्रेसला यश आले. त्याचा अप्रत्यक्ष फायदा धंगेकर यांना देखील झाला. या पोटनिवडणुकीकडे राज्याचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. सर्व ताकद लावून देखील भाजपला या निवडणुकीत यश मिळविता आले नाही.

कसबा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसबरोबरच एकसंध राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि फुटलेली शिवसेना होती. परंतु या सर्वांची एकत्रित ताकद आणि काम करणारा कार्यकर्ता म्हणून धंगेकर यांची इमेज याचा फायदा झाला आणि धंगेकर विजयी झाले. मात्र गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून केले आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना फुटीचा पुणे शहरातील संघटनेवर फारसा परिणाम दिसला नाही. दरम्यानच्या कालवधीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्याचा परिणाम मात्र शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसवर झाला आहे. अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांची मोठी संख्या पुणे शहरात आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतील परिस्थिती आणि आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धंगेकर यांच्या उमेदवारीने मोहोळ विरूद्ध धंगेकर अशी सरळ लढत होणाऱ्या असल्याचे सध्या तरी चित्र आहेत. त्यात धंगेकर कितपत यशस्वी होतात याकडे लक्ष लागले आहे.