मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा माझ्या विजयावर परिणाम नाही – पंकजा मुंढे

पुणे, २१ मार्च २०२४: बीडची मी पालकमंत्री होते. मला माझ्या विजया बद्दल पुर्ण विश्वास आहे. ही माझी पाचवी निवडणूक आहे. पालकमंत्री असताना मी जे काम केले, जनतेच्या मनात माझ्या बद्दल जे स्थान आहे त्यावरुन मला विश्वास आहे की मी मोठा विजय मिळवेन. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा माझ्यावर परिणाम होणार नाही, असा विश्वास भाजपा नेत्या पंकजा मुंढे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

भाजपा महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरुड मधील २४ तास खुल्या जनसंपर्क कार्यालयाला पंकजा मुंडे यांनी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आमदार माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या.
मुंढे म्हणाल्या की, मोहोळांची मोठी बहिण म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. यानंतर नगरला देखील जाणार आहे. माझ्या जिल्ह्यात उद्या दुपारी पोहचेल.

मराठा आंदोलनाचा वा आपल्या विरोधात कोणता उमेदवार उभा आहे म्हणून आपल्या विजयावर परिणाम होणार नाही असे सांगताना मुंढे म्हणाल्या की, परिणामांचा विचार करुनच निवडणूकीची आखणी होत असते. बीड मतदार संघ पुढारलेला आहे. माझ्या कामाच्या बळावर मी चांगल्या मताधिक्क्याने विजयी होईल.

आपल्या उमेदवारी बद्दल बोलताना मुंढे म्हणाल्या की, मी सध्या लोकसभेच्या उमेदवारी कडे पूर्णतः लक्ष दिले आहे. राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत. ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे. या पक्षाचे जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील.

बीड जिल्ह्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत. येथील मतदार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करतात. पालक मंत्री म्हणून केलेल काम आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी, जाती धर्माशी आलेला संबंध यामुळे माझ्या विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही. असेही मुंढे यांनी सांगितले.

दुसरीकडे प्रचार करायला जाणार का या प्रश्नावर मुंढे म्हणाल्या की, मागच्या तीनही निवडणुकात मी राज्यभर व राज्याबाहेरही प्रचार केलेला आहे. आता पक्ष मला काय सांगेल त्यानुसार मी ठरवेल.