नरेंद्र मोदी औरंगजेबच – संजय राऊतांची पुन्हा एकदा टीका

मुंबई, २१ मार्च २०२४: “पंतप्रधान आहात, त्या पदाचा सन्मान ठेवा. गरीब त्यांना आशीर्वाद वगैरे काहीही देत नाहीयेत. ईव्हीएमला शिव्या सामान्य माणूस देत होता. लफंगेगिरी करुन तुम्ही निवडून येता, औरंगजेबही हेच करत होता. औरंगजेबाची वृत्ती खा खा होती. कुणीही विरोधक राहू नये आणि सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं कुणी समोर असूच नये ही औरंगजेबाची वृत्ती होती. आम्ही त्याबद्दल भाष्य केलं होतं. मोदींनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद केलं पाहिजे. देशाचे पंतप्रधान ते काही काळासाठी आहेत त्यांनी आता पंतप्रधान पदाचा सन्मान राखावा. कुणीही मोदींना शिव्या देत नाहीये. ते कायम असंच वागतात. ईडी सीबीआयच्या तलवारी त्यांच्याकडे आहेत. आमचं सरकार आलं तर आम्ही असं घाणेरडं राजकारण करणार नाही. मोदींना आम्ही सुरक्षा पुरवू,’’ अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली.

खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुलढाणा येथील सभेत औरंगजेब म्हटलं गेलं. त्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलाच समाचार घेतला. “आमचे विरोधकही निवडणुकीची तयारी करत आहेत. आजच त्यांनी माझ्याविषयी १०४ थं दुषण वापरलं. मला औरंगजेब केलं गेलं. मोदींचा शिरच्छेद करा अशी घोषणा केली गेली आहे. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी सुरु असल्या तरीही लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. त्यामुळे मी याकडे लक्ष देत नाही. २६०० हून जास्त पक्ष. ९७ कोटी मतदार, दोन कोटी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार या उत्सवात सहभागी होत आहेत. ” असं मोदी यांनी म्हटलं आहे. आता या टीकेला संजय राऊत यांनी पुन्हा उत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “मोदींच्या मागे धनशक्ती आहे, ती अघोरी शक्ती आहे असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर मोदी रडले. वारंवार असं रडणं पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तिथे आम्ही म्हटलं होतं की महाराष्ट्रावर काही लोक दिल्लीहून आक्रमण करु इच्छितात, गुजरातहून आक्रमण करु इच्छितात. पण महाराष्ट्राने औरंगजेबाचं आक्रमण संपवलं, त्याच्याशी लढा दिला. त्याची कबर इथे महाराष्ट्रात बांधली गेली. त्याचप्रमाणे आम्ही म्हटलं की हे आक्रमण आम्ही संपवू. औरंगजेबासारखं धोरण इथे चालणार नाही हे आम्ही म्हटलं. यात मोदींचं नाव कुठे घेतलं. ते अर्थ काहीही काढतील. त्यांची डिक्शनरी आणि आमची डिक्शनरी वेगळी आहे. आमची डिक्शनरी देशभक्ती सांगणारी तर त्यांची स्वार्थ सांगणारी आहे.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.