अजित पवारांची डोकेदुखी वाढली: शिवतारे नंतर हर्षवर्धन पाटील यांनीही काढली जुनी दुष्मणी

मुंबई, २० मार्च २०२४ ः शिंदे गटातले नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यापाठोपाठ आता हर्षवर्धन पाटील यांनीही महायुतीच्या धर्माविषयी वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट काही वेळापूर्वी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील या दोघांनीही घेतली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांनी नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा रोख अजित पवारांकडेच होता हे उघड आहे. त्यामुळे आता जुनी दुष्मणी अजित पवारांना जड जाणार असल्याचे सपष्ट झाले आहे.

हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटी यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला “महायुतीत असलेल्या सगळ्याच पक्षांनी युतीचा धर्म पाळला पाहिजे. जाहीर भाषणांमध्ये मला धमक्या दिल्या गेल्या, अर्वाच्य भाषा वापरली गेली. तरीही मंचावर असलेले लोकप्रतिनिधी काहीही बोलले नाही. हे चुकीचं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही परिस्थिती घातली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीवर आणि बारामती लोकसभा मतदारसंघावर चर्चा झाली. स्थानिक कार्यकर्त्यांची भावना काय ते मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. देशाच्या पंतप्रधानपदी मोदींना बसवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. मात्र स्थानिक पातळीवर जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते सोडवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. पुढच्या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्याशी चर्चा करणे आवश्यक असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं. त्यावर आपण यावर योग्य तो तोडगा काढू असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही आमची या प्रश्नावरती आमची चर्चा झाली आहे. एक गोष्ट निश्चित आहे की देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बसवणं ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे, त्याबद्दल आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही. मात्र जे काही स्थानिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नामुळं जे काही विषय पुढे आलेले आहेत या विषयाच्या संदर्भात चर्चा झाली आणि आम्हाला फडणवीस यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री आश्वासित केलं आहे” अशीही माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.