पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळा राम मंदिरात राबवली स्वच्छता मोहीम

नाशिक, ११ जानेवारी २०२३ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर होते. आपल्या नाशिक दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. या रोड शोला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसंच त्यानंतर त्यांनी गोदावरी नदीचाच एक भाग असलेल्या राम कुंडावर जलपूजन केलं. गोदावरी नदीच्या तीरावर जलपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. तसंच नाशिकच्या प्रसिद्ध काळा राम मंदिरात त्यांनी पूजा आणि महाआरती केली. यावेळी त्यांनी स्वच्छता मोहीमही राबवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या काळा राम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलं आणि काळा राम मंदिरात आरतीही केली. त्याचेही फोटो चर्चेत आहेत. अयोध्येत २२ जानेवारीच्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन केलं जातं आहे. तसंच रामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याच्या आधी देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. तसंच आज काळा राम मंदिरात त्यांनी जी स्वच्छता मोहीम राबवली त्याचीही चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं महत्त्वाचं आवाहन
“नाशिकच्या पंचवटीत प्रभू रामचंद्रांनी बराच काळ घालवला होता. मी आज या भूमीला नमन करतो. मी आवाहन केलं होतं की २२ जानेवारी पर्यंत देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवू. आज मी मंदिरात आलो तेव्हा मला दर्शनाचं आणि स्वच्छता करण्याचं भाग्य लाभलं आहे. आज मी पुन्हा आवाहन करतो की राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने देशातली सगळी मंदिरं स्वच्छ करावीत. प्रत्येकाने श्रमदान करावं” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.