बाळासाहेब वाघ तर भाजप महाराष्ट्राला लागलेला डाग आहात – संजय राऊतांची टीका

मुंबई, ११ जानेवारी २०२४: बाळासाहेब ठाकरे वाघ होते, त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र बाबरी मशिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे कुठे होते?”, असा खोचक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात. ‘कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशी गर्जना उगाच दिली जात नाही. भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला, असं कुणाला म्हणताना ऐकलं आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठीच शिवसेनेची स्थापना केली

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, बाबरी कोसळताना शिवसेना कुठे होती? हे पाहायचे असेल तर बाबरी पाडल्यानंतर विशेष न्यायालयाने आरोपी ठरविलेल्यांची नावे वाचा. देवेंद्र फडणवीस वकील आहेत, त्यांनी आरोपपत्र एकदा पाहावे. मग त्यात किती शिवसैनिक आहेत, हे महाराष्ट्राला सांगावे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत. रामाचे श्रेय तुम्हालाच घ्या. पण प्रभू श्रीराम तुम्हाला श्रेय घेऊ देईल का? हे २०२४ ला कळेल.

“हजारो शिवसैनिक अयोध्या आंदोलनात सहभागी झाले होते. दैनिक सामनावरच १५० खटले दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि मी स्वतः लखनऊच्या सीबीआय न्यायालयात हजर झालेलो आहोत. मोरेश्वर सावे आणि अनेक आमदार, नगरसेवक त्यावेळी अयोध्या आंदोलनात सहभागी झाले होते. आज भाजपासह असलेल्या शिंदे गटातील शेळ्या-मेंढ्या या त्यावेळेस तिथे नव्हत्या. देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत गेलेले असून ते अनेक मायावी रुपं धारण करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. २०२४ या शूर्पणखेचं नाकच कापू”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकच्या दौऱ्यावर असून ते काळाराम मंदिरात दर्शनासाठी जात आहेत. या दौऱ्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात आधी काळाराम मंदिराचा उल्लेख नव्हता. रोड शो आणि इतर काही कार्यक्रम होते. पण काळाराम मंदिरात जाऊन पूजाअर्चा करण्याचा कार्यक्रम अचानक ठरला आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारी रोजी काळाराम मंदिरात जाऊन आरती करण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपाने पंतप्रधान मोदी यांना काळाराम मंदिरात आणण्याचा घाट घातला आहे. आम्ही ठाकरे गटावर कशी कुरघोडी करत आहोत, असे भाजपाकडून दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. पण राम हे कुरघोडी करण्याचे साधन आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.