उपसभापतींच्या दालनासमोर उद्धव ठाकरे आणि केसरकरांमध्ये चकमक

नागपूर, २९ डिसेंबर २०२२: हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून पुन्हा एकदा बंडखोरीचा मुद्दा तापला आहे. उद्धव ठाकरेदेखील नागपुरात असून यावेळी एकनाथ शिंदेंसह बंडात सामील झालेल्या दीपक केसरकरांशी त्यांचा सामना झाला.

उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याच्या दालनासमोर अचानक आमने-सामने आले. यावेळी दीपक केसरकर उपसभापतींच्या दालनातून बाहेर चालले होते, तर उद्धव ठाकरे आतमध्ये प्रवेश करत होते. यादरम्यान दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला. मात्र या काही सेकंदांच्या संवादातही उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली.

उद्धव ठाकरेंनी यावेळी दीपक केसरकरांकडे विधिमंडळातील कामकाज तसंच सभागृहाबाहेर शिंदे गटाकडून सुरु असलेल्या घडामोडींचा उल्लेख करत आपली नाराजी व्यक्त केली. जे काही चाललं आहे ते योग्य नाही. शाखा ताब्यात घेणं, कार्यालयं ताब्यात घेणं शोभत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर दीपक केसरकरांनी तुम्ही अजूनही नाराज आहात का? अशी विचारणा केली. यानंतर दोन्ही नेते आपापल्या मार्गाने निघून गेले.