शाहंच्या सभेपूर्वी बच्चू कडूंचा ‘प्रहार’; पहिले आक्रमक झाले, नंतर पोलिसांच्या पाया पडले

अमरावती, २३ एप्रिल २०२४ : अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांच्यामधून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. दरम्यान, महायुतीकडून नवनीत राणा यांना भाजप प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. आज अमरावतीमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. अमरावती येथे अमित शाह यांची सभा होणार असल्याने कडू यांना मैदानात जाण्यापासून अडवल्याने हा राडा झाला. त्यानंतर कडू यांनी थेट पोलिसांसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं.

२४ एप्रिलला अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडू हे आपले उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते. त्यासाठी रितसर निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत कडू यांची सभा रद्द करत तेथे अमित शाह यांच्या सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी पोलिसांसमोरच आंदोलन पुकारलं.

अमित शाह यांची सभा होणार असल्याने येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, बच्चू कडू यांची सभा होणार असल्याने ते कार्यकर्त्यांसोबत सभास्थळी आले असता, कडू यांना आत जाण्यापासून रोखलं. त्यावर कडू यांनी आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी आहे तरी आपण का अडवता असं विचारलं. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यावरून कडू संतापले. पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखी आमची समजूत का घालत आहेत असा थेट प्रश्न कडूंनी यावेळी पोलिसांना केला. त्याचबरोबर अमित शाह यांच्या सभेसाठी परवानगी मिळाली असेल तर ती दाखवावी अन्यथा आम्हाला सभा घेऊ द्यावी असा आग्रह कडून यांनी यावेळी केला. मात्र, पोलिसांनी कडू यांना पुढे जाऊ दिलं नाही.

भाजपच्या सांगण्यावरून पोलीस काम करत आहेत
या घटनेने पुरते संतापलेल्या कडू यांनी यावेळी भाजपसह पोलिसांवर तिखट शब्दांत प्रहार केला. पोलीस आपलं ऐकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर कडू यांनी पोलिसांसमोरच निवडणूक आयोगाने दिलेलं पत्र फाडलं. तसंच, पोलिसांनी आपल्या गळ्यात भाजपचा गमजा घालावा आणि आपल्या गाडीवर भाजपचे झेंडे लावावेत अशा शब्दांत पोलिसांना प्रतिउत्तर दिलं. त्याचबरोबर भाजपच्या सांगण्यावरून पोलीस काम करत असून आम्हाला मैदानाबाहेर काढलं जात असल्याचा आरोपही केला.