पुण्याच्या मेधा कुलकर्णींना राज्यसभेची संधी ? कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू

पुणे, १४ फेब्रुवारी २०२३ : भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे ‘थकबाकी नसल्याच्या (नो ड्युज) प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कुलकर्णींना राज्यसभेच्या उमेदवारीची लॉटरी लागणार का या चर्चेला उधान आले आहे.

राज्य सभेच्या सहा जागा रिक्त झाल्या असून त्यामध्ये भाजपच्या तीन जागांचा समावेश आहे. या तीन जागांसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र, उमेदवारी नक्की कोणाच्या पदरात पडणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. असे असतानाच पुण्यातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे केलेल्या एका अर्जाने त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. कुलकर्णी यांनी महापालिकेकडे ‘नो ड्युज प्रमाण पत्रासाठी अर्ज केला आहे. हे प्रमाणपत्र प्रामुख्याने निवडणूक अर्जासोबत द्यावे लागते. सद्यस्थितीला आता राज्य सभेची निवडणूक होणार आहे, त्यापाठोपाठ लोकसभेच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी नक्की कोणती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याशिवाय भाजपकडूनच त्यांनी तयारीला लागा असे तर आदेश आलेले नाही ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. याबाबत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

दरम्यान कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यास लोकसभेच्या उमेदवारीची गणिते बदलणार आहे. २०१९ ला विधानसभेत कुलकर्णी यांचे तिकिट पक्षाने कापले होते. त्यानंतर खासदार गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ब्राम्हण समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले नाही. कसबा पेठ पोटनिवडणूकीत त्याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे आता लोकसभेला ब्राम्हण चेहरा द्यावा अशी मागणी होत होती. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय नेते सुनिल देवधर यांनी तयारी सुरू केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव चर्चेत आहे. आता राज्यसभेसाठी कुलकर्णीना संधी मिळाल्यास फडणवीस आणि देवधर दोन्ही नावे स्पर्धेतून बाद होऊ शकतात. अथवा थेट लोकसभेलाच कुलकर्णींचे नाव पुढे आणून भाजप थेट धक्कातंत्राचा अवलंब करू शकते अशीची चर्चा आहे.