अकार्यक्षम, हतबल फडणवीसांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही कळेना -नाना पटोले संतापले

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४: दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना काल (दि. ८ जानेवारी) घडली. या संपूर्ण घटनेने राज्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी सरकारवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केल्यानंतर फडणवीस यांनी गाडी खाली कुत्रे आले तरी राजीनामा मागतील असे प्रत्युत्तर दिलेआहे. याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त होऊन समाचार घेतला आहे. फडणवीस हे अकार्यक्षम, हतबल, लाचार गृहमंत्री आहेत, त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही कळेनासा झाला आहे, अशा शब्दात टीका केली.

घोसाळकर प्रकरणावर फडणवीस यांमनी प्रतिक्रिया दिल्यानंतर पटोलेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत. गुंडांना कसलीच भिती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधल गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुंडांचा वावर बिनदक्कीतपणे सुरू आहे. तडीपार गुंडाना राजाश्रय, पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीसही हतबळ झाले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून हे ‘गुंडाराज’ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी पटोलेंनी केली.

गाडीखाली कुत्र मेले तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रतिउत्तर

त्यांनी पुढं लिहिलं की, राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभीर्य नाही. ‘गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील’, असे बेजबाबदार विधान करून त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीसांना माणूस आणि कुत्रा यातील फरकही कळत नाही का? महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिलेल नाही, असं पटोले म्हणाले.