महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड; चाकण शहर, एमआयडीसी परिसरात वीज खंडित
पुणे, दि. १८ नोव्हेंबर २०२३: महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब २२० केव्ही आळेफाटा उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे चाकण १३२ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे ४० हजार ३५० घऱगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. १८) दुपारी १२.३० ते १.०५ वाजेपर्यंत बंद राहिला.
याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या आळेफाटा २२०/१३२ केव्ही उपकेंद्रातून १३२ केव्ही वीजवाहिनीद्वारे चाकण १३२ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. आज दुपारी १२.३० च्या सुमारास आळेफाटा उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे सुमारे ४८ मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली. त्यामुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे चाकण १३२ केव्ही उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी चाकण उपकेंद्रातून महावितरणच्या २२ केव्हीच्या सात वीजवाहिन्यांचा देखील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे चाकण शहर तसेच एमआयडीसी परिसरातील खराबवाडी, म्हाळुंगे, आंबेठाण, रोहकल, बिरदवडी, वाकी, ज्ञानेकरवाडी, कडाची वाडी या गावांतील ३८ हजार घरगुती, वाणिज्यिक तसेच २ हजार ३५० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १.०५ वाजेपर्यंत बंद राहिला.