बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांची बायको
पुणे, २५ सप्टेंबर २०२३ ः अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? यावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या निमित्ताने बारामातीतील सत्ता संघर्ष आता पवार कुटुंबातच सुरु होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
बारामतीतून सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्याविरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयाचं पूर्ण ताकदीने स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझं म्हणणं आहे की , आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्ली काय दडपशाही सुरू असते, हे संपूर्ण देश पाहतोय. पण आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळे मला वाटतं की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान केला पाहिजे.”
“भारतीय जनता पार्टी तीन वेळा माझ्या विरोधात निवडणूक लढली. यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचं मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे. टिकली पाहिजे. आपण अशा सर्व निर्णयांचं पूर्ण ताकदीने स्वागत केलंच पाहिजे. कुणीतरी विरोधात लढलंच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.