“गोपीचंद पडळकरांना काळं फासा अन् एक लाख मिळवा” – अजित पवार गटातील नेत्याची घोषणा

नागपूर, २० सप्टेंबर २०२३: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ‘लांडगा’ असा केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर चौफेर सडकून टीका करण्यात येत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पडळकरांविरोधात अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी आंदोलनही केली आहेत. आता पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा, अशी घोषणा अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहरांध्यक्षांनी केली आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, “पडळकर दिसतील तिथे भर चौकात जोड्यानं मारा. नंतर पडळकरांना काळं फासून नागपूरला येत एक लाख मिळवा. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करत आहे पडळकरांची जागा दाखवल्याशिवाय ते सुधारणार नाहीत. नागपूरला आल्यावर पडळकरांना सोडणार नाही. पडळकरांनी नागपूरला येऊ नये. आल्यावर मार खाल्याशिवाय जाणार नाहीत,” असा इशारा प्रशांत पवारांनी पडळकरांना दिला आहे.

हे आहे पडळकरांचं वक्तव्य
“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप