भाजप युतीला झटका, महादेव जानकर स्वतंत्र वाटेवर
सोलापूर, २१ ऑगस्ट २०२३: एनडीएच्या बैठकीत भाजपने आम्हाला बोलवले नाही आणि आम्हाही काही बोलणार नाही. मी कोणाकडेही भीक मागायला जाणार नाही. माझा पक्ष वाढवून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीसाठी चांगले वातारवण तयार करणार आहे. असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट करत भाजपला झटका दिला. जानकर यांच्या पाठीमागे धनगर समाजाची चांगली मते आहेत.
राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटाच्या येण्याने राज्यातील भाजपाप्रणित महायुती मजबूत झाली आहे. तर महाविकास आघाडीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच राज्यात असे काही लहान-मोठे पक्ष आहेत जे ना कुठल्या आघाडीत आहेत ना युतीत. त्यापैकीच एक म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष. महादेव जानकरांचा हा पक्ष मागील निवडणुकीत एनडीएबरोबर होता. अद्याप त्यांची कोणत्याही पक्षाबरोबर युती झालेली नाही. जानकर सध्या रासपच्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. अशातच त्यांनी आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
महादेव जानकर यांनी प्रसार माध्यमांसी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही महायुतीची साथ सोडलीय का? त्यावर जानकर म्हणाले, या राज्यात, देशात आपला पक्ष वाढला पाहिजे, यासाठी गेल्या दिड महिन्यांपासून आम्ही रासपची जनस्वराज्य यात्रा काढली आहे. युतीबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी (महायुती) आम्हाला बोलावलं नाही आणि आम्हीसुद्धा त्यांना गृहित धरलं नाही.
महादेव जानकर म्हणाले, अलिकडेच त्यांची एनडीएची बैठक झाली. त्या बैठकीसाठी त्यांनी आम्हाला निमंत्रण पाठवलं नव्हतं. आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. एनडीए किंवा इंडियापैकी (विरोधकांची आघाडी) कोणीच आम्हाला निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे आम्ही सध्या एकटे चालत आहोत. माझा स्वभाव पहिल्यापासूनच असा आहे. आय एम नॉट अ डिमांडर, वुई आर कमांडर, भीक मागून हक्क मिळत नाहीत. सत्ता मिळवायची असेल तर स्वतःच्या हिंमतीवर आणि जबाबदारीने घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे.
महादेव जानकर म्हणाले, सध्या देशात भाजपा आणि काँग्रेस हे दोन मोठे पक्ष आहेत. त्यांच्याबद्दल आपण आत्ताच टिप्पणी करायची गरज नाही. महाराष्ट्रात रासपला चांगली संधी आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यात रासपसाठी चांगलं वातावरण आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप