आधी म्हणायचे चक्की पिसिंग पिसंग अन् आता किसिंग किसिंग

छ्त्रपती संभाजीनगर, १९ ऑगस्ट २०२३: भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केल्यानंतरही अजित पवारांना सत्तेत सहभागी करुन घेणाऱ्या भाजपवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला आहे. आधी अजित पवारांविरोधात बोलताना चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे आणि आता अजितदादा किसिंग किसिंग सुरु आहे, अशा शब्दांत दानवेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

सामनातही आज म्हटलंय की, सांभाळून राहा कारण राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावं लागतंय. ज्या व्यक्तीविरोधात सत्तार हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडीभर पुरावे घेऊन जायचं ठरलं होतं त्या अजित पवारांना चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं आणि आता अजितदादा किसिंग किसिंग सुरु आहे, अशा शब्दांत दानवेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.

छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही यावेळी दानवेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, “भागवत कराड हे चांगला माणूस आहेत पण चांगले नेते नाहीत. भाजप आपला ग्राहक वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. या पक्षात आता मुळचे लोक बोटावरच मोजण्याइतपतच राहिले आहेत. हा पक्ष मोठा करणारे लोक कुठे आहेत? असा सवाल करताना या सर्व गोष्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्या असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. कॅगचा अहवाल समोर आला आहे त्यामुळं आता भाजपचे टोलनाकेही समोर येतील, लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून कोणी बसलेलं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच जिंकणार असंही दानवेंनी म्हटलं आहे. शिंदे गटाला आणि भाजपला आम्ही पुरुन उरु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप