भाजपतर्फे १४ ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका दिन

पुणे, ११ ऑगस्ट २०२३ः देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १४ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणी होऊन त्यामध्ये लाखो भारतीयांची हत्या झाली. त्याचे स्मरण करण्यासाठी हा दिवस विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना) स्मृती दिन पाळण्यात येणार आहे. फाळणीनंतरच्या हिंसाचारात प्राण गमाविलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, राजेश येनपुरे, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, अमोल कविटकर यावेळी उपस्थित होते.

ब्रिटिशांनी १४ ऑगस्ट १९४७ ला अखंड भारताच्या नकाशाला छेद देऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण केले. फाळणी झाल्यानंतर स्थलांतराच्या काळात प्रचंड हिंसाचार होऊन अनेकांची हत्या करण्यात आली. देशाच्या विभाजनामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि यामध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांचे स्मरण करण्यासाठी भाजपतर्फे ‘विभाजन विभीषिका दिन’ पाळला जाणार आहे. या दिवशी मूक मोर्चा यासह इतर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपाध्ये यांनी केले.

आम्ही पत्रकारांचा नेहमी सन्मान केला आहे. पाचोरा येथे पत्रकारास झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध करतो. याप्रकरणात पोलिस योग्य ती कारवाई करतील, असे उपाध्ये यांनी सांगितले.

नवाब मलिकांबाबत भाष्य टाळले
मनीलाँड्रींगच्या प्रकरणात नवाब मलिक यांना इडीने अटक केली होती. त्यावेळी भाजपतर्फे मलिक यांच्यावर त्यांचे अंडरवल्डशी संबंध असल्याची टीका केली होती. आज मलिक यांना जामीन मिळाला असता मलिक हे अजित पवार यांच्यासोबत आले तर काय भूमिका असेल असे उपाध्ये यांना विचारले असता, ‘‘ मलिक यांना जामीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच ते कोणाकडे जाणार या जर तरच्या प्रश्‍नावर उत्तर देता येणार नाही असे त्यांनी सांगितले.