“राहुल गांधी म्हणजे राजकारणातील इम्रान हाश्मी” – नितेश राणेंनी काँग्रेसला डिवचले

मुंबई, १० ऑगस्ट २०२३:  एकीकडे लोकसभेत राहुल गांधींनी दिलेल्या फ्लाइंग किसवरून घमासान सुरू असतानाच आता, भाजप आमदार नितेश राणेंनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. राहुल गांधींचे कालचे भाषण म्हणजे कॉमेडी म्हणावं की संसदेतील भाषण म्हणावं असा प्रश्न पडला असून, राहुल गांधी म्हणजे राजकारणातील इम्रान हाश्मी असल्याचे म्हटले आहे. राणेंच्या या विधानामुळे आता काँग्रेस विरूद्ध भाजप असा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

राणे म्हणाले की, प्रत्येक वक्त्याला प्रेरणा मिळावी असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल भाषण केलं. त्या भाषणाच्या मिरच्या विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याला झोंबल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी हे संसदेत फ्लाइंग किस देत फिरत असतात असे म्हणत राहुल गांधींनी जसं युद्ध जिंकलं आहे त्याप्रमाणे महिला खासदार आणि संजय राऊत त्यांना पाठिंबा देत असल्याची टीकाही राणेंनी यावेळी बोलताना केली. एका महिला सदस्याला फ्लाइंग किस देणं हे कोणाच्या संस्कृतीमध्ये बसतं याचं उत्तम उदाहरण कालपासून ठाकरे गटाचे खासदार आणि काँग्रेस खासदार देत असल्याचेही ते म्हणाले.

राऊतांना नेमकं काय म्हणायचं?

पुढे बोलताना राणेंनी राऊतांवर हल्लाबोल करत संजय राऊत हे फ्लाइंग किस देत संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील इम्रान हाश्मी म्हणायचं की, संजय राजाराम राऊत म्हणायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.