खातेवाटपासंदर्भात वाद नाही : प्रफुल्ल पटेल
नवी दिल्ली, १२ जुलै २०२३ : ‘खाते वाटपासंदर्भात आमचा कुठलाही वाद नाही, भाजप आणि शिवसेनेकडे असलेली काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळतील, तसेच विधान परिषदेत पाठवावयाच्या बारा आमदारांमध्ये ‘राष्ट्रवादी’चाही वाटा असेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. ‘सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून अजित पवार यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेट झाली नव्हती. या भेटीसाठीच आम्ही आलो,’ असे पटेल यांनी स्पष्ट केले.
भाजप नेत्यांसोबतच्या भेटीदरम्यान मंत्रिमंडळ खाते वाटपाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही, असे पत्रकारांशी बोलताना पटेलांनी सांगितले. आधीची खाती ही भाजप आणि शिवसेनेकडे (शिंदे गट) आहेत. कुठले खाते काढून राष्ट्रवादीला द्यायचे आणि संबंधित मंत्र्याला कुठल्या खात्याचा कारभार द्यायचा, याबाबत चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हसन मुश्रीफ हे वैयक्तिक कामासाठी आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. १८ जुलैला होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
शिंदे गटातील मंत्री आक्रमक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या मंत्र्यांनी मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल स्वीकारणार नाही, असे खडे बोल शिंदे यांनाच सुनावल्याचे समजते. शिंदे गटातील काही मंत्र्यांची महत्त्वाची खाती अजित पवार गटाला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप