माझ भांडण शरद पवार व त्यांच्या कुटुंबाशी नाही – दिलीप वळसे पाटील
आंबेगाव, १० जुलै २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी जाहीरपणे मत व्यक्त करण्यास नकार देत भाषण केलेले नव्हते. मात्र त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत “आणखी तुम्हाला पवार साहेबांनी काय द्यायला पाहिजे होते ?” असा प्रश्न दिलीप वसे पाटील यांना विचारला होता. त्यावर आता वळसे पाटील यांमी उत्तर देत “माझ्या राजकीय अनुभवापेक्षा रोहित पवार यांचे वय कमी आहे. माझं भांडण शरद पवार यांच्याशी व यांच्या कुटुंबातील व्यक्तीशी नाही” अशी भूमिका वळसे पाटील यांनी स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यभरात दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आज अनेक धक्कादायक खुलासे करत शरद पवारांची साथ का सोडावी लागली, याचा खुलासा केला.
वळसे पाटील म्हणाले, त्यांचं वय ३७ वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन ४० वर्षे झाली. माझं हे अनुभव पाहता त्यांचं वय लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं. माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा, असं मी त्यांनी सांगितलं होत. माझं भांडण पवार साहेब किंवा त्यांच्या कुटुंबाशी नाही.
मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. तालुक्यातील जे प्रश्न शिल्लक राहिले आहेत ते सोडवायचे आहेत. आपली लढाई शरद पवार यांच्याबरोबर नाही. त्यांच्यावर कोणताही राग नाही. त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे. कारखाना, बँका, बंधारे हे सर्व पवार साहेबांमुळे झाले माझ्यामुळे नाही असेच मी नेहमी सांगत असतो, असे वळसे पाटील म्हणाले.
काहींनी निष्ठेचा प्रश्न निर्माण केला. दहा वर्षे कारखान्याचा अध्यक्ष, सात वर्ष बाजार समितीचे सभापती, लोकसभेला तिकीट देऊनही आता वेगळी भूमिका घेतली. त्यांनी नशीब अजमवायला हरकत नाही. पक्षाकडून सत्तेची पदे घेऊन प्रत्येक गावात जाऊन दुफळी गटतट करण्याचे काम त्यांनी केले. अनेक वेळा सांगूनही ऐकले नाही असा टोला वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचे नाव न घेता लगावला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप