छगन भुजबळांच्या मतदारसंघात शरद पवारांनी मागितली माफी

येवले, ८ जुलै २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आज त्यांचा पहिला राजकीय दौरा हा नाशिक जिल्ह्यात काढला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शरद पवार यांनी मतदारांची माफी मागितली. “माझा निर्णय चुकला, माझ्या निर्णयामुळे तुम्हाला त्रास झाला असे मनात यापुढे मी तुम्हाला त्रास होऊ देणार नाही.” असा शब्द पवार यांनी दिला. दरम्यान मतदारांची माफी मागत छगन भुजबळ यांना पुढच्या काळात धडा शिकवणार असाच संदेश शरद पवार यांनी दिल्याची चर्चा रंगलेली आहे.

अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षात दोन गट पडले आहेत. पक्ष फूटल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (८ जुलै) पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली. पवार यांनी नाशिकच्या येवला येथे सभेला संबोधित केलं. या सभेत बोलताना शरद पवार यांनी त्यांच्यावर स्वतःच्या पक्षातील लोकांनी केलेल्या टीकेला उत्तरं दिली. अजित पवारांनी केलेल्या निवृत्ती आणि वयाबद्दलच्या वक्तव्यावर पलटवार केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही उत्तर दिलं.

भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवार म्हणाले, आज मी इथे का आलोय? मी इथं कोणाचं कौतुक करण्यासाठी आलो नाही किंवा कोणावर टीका करण्यासाठीदेखील आलो नाही. मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलोय. मी मतदारांची माफी मागायला आलोय. माफी मागतोय कारण माझा अंदाज चुकला. माझे अंदाज फारसे चुकत नाहीत. पण इथं मात्र माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयामुळे तुम्हालाही यातना झाल्या असतील. तर माझं कर्तव्य आहे की, मी तुमची माफी मागितली पाहि
शरद पवार म्हणाले, मी माफी मागितली पाहिजे, कारण आज ना उद्या मला लोकांना सामोरं जायचं आहे. कधी ना कधी लोकांच्या समोर जायची वेळ येईल. ती वेळ आज येईल, उद्या येईल, परवा येईल, एका महिन्याने अथवा वर्षाने येईल, पण ती वेळ येणारच आहे, म्हणून माफी मागतो. मी पुन्हा अशी चूक करणार नाही, योग्य निकाल सांगेन. त्यामुळे मला मतदार संघातील लोकांची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही.

आपण पक्ष फूटण्याचा अंदाज लावू शकलो नाही, अशी खंत शरद पवार यांनी आज (८ जुलै) दुपारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे शरद पवार त्याबद्दलच माफी मागत असावेत असं बोललं जात आहे. तर काहींच्या मतानुसार शरद पवारांचा रोख छगन भुजबळांकडे होता. भुजबळांना येवल्यातून उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं, त्याच भुजबळांनी पक्षाशी बंडखोरी केल्यामुळे मतदारांना त्रास झाला आहे असं म्हणत पवार यांनी माफी मागितली, असं म्हटलं जात आहे.