अजित पवारांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नियुक्त्यांचे स्वागत
मुंबई, १० जून २०२३ ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्ली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची नियुक्त्यांची घोषणा केली. यासह अन्य नेत्यांवरही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पण यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणताही जबाबदारी दिलेली नाही त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात असताना पवार यांनी ट्विट करत नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या सर्वाचं अभिनंदन केलं आहे.
अजित पवार म्हणाले, “आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.”
“या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! शरद पवारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. “आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन,” असं अजित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप