शरद पवारांनंतर त्यांचे खास संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

मुंबई, ९ जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मीटरवरून ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर आता पवार यांचे खासमखास व ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनाही गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली. “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,”, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली. यानंतर आता स्वतः संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (९ जून) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “मला धमक्या आजच आलेल्या नाहीत. आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीसांना धमक्या आल्याबाबत पुराव्यांसह चारवेळा कळवलं आहे. ठाण्यात कोण कुठे माझ्यावर हल्ला करण्याचं कारस्थान करत आहे, गुंडांच्या टोळ्या वापरून माझ्यावर कसा हल्ला करावा याच्या योजना ठाण्यात आखल्या जात आहेत. हे मी पुराव्यांसह कळवलं आहे. मात्र, ठाण्यात त्याच गुंडाला संरक्षण देण्यात आलं.”
या गुंडाला खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या गुंडाचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर जळकत आहेत. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंबरोबरही या गुंडांचे फोटो ठाण्यात लागले आहेत. आम्हाला मारण्याचं षडयंत्र रचणाऱ्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं. ही या राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला
“मधल्या काळात पुण्यातून धमक्यांचं सत्र सुरू झालं होतं. तेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. आता हे नवीन प्रकरण सुरू झालं आहे. तुम्हाला कळवणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही सरकारकडे पोलीस संरक्षण मागत नाही. हे पोलीस मिंधे गटाला सुरक्षा द्यायलाच पुरत नाहीत. ते आम्हाला सुरक्षा कसे देणार,” असं म्हणत राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप