अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीस संतप्त
कोल्हापूर, ७ जून २०२३: अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल, याच्यामागे कोण आहे, हे सुद्धा पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
कोल्हापूरमध्ये काल औरंगाजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर फडणवीसांनी शांततेचं आव्हान केलं आहे.
अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल. जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे, यासाठी तर या औलादी पैदा झाल्या नाहीत ना, हे आपल्याला तपासावं लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे, कोणीही कायदा आणि सुव्यवस्था खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
कायदा हातात घेऊ नये, आम्ही कुठल्याही परिस्थितीत औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही. कोणीही औरंगजेबाचे उदात्तीकरण करु शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हे नव्याने पैदा झाले आहेत, त्यांचे बोलविते धनी कोण आहेत, हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच, पण औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे, त्याला डाग लागतो. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूरमध्ये काल औरंगजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाला होता. त्यावरुन दगडफेकीचा झाल्यानंतर पोलिसांनी कालच जिल्ह्यात जमावबंदी लागू केली होती. त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. हे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. मात्र, आंदोलक भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर करावा लागला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप