टीईटी घोटाळ्यात नाव आल्यामुळे अब्दुल सत्तारांच्या मंत्रीपदाबाबत आश्चर्य

मुंबई, १८/०८/२०२२- सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर टीईटी घोटाळ्याच्या संदर्भात त्यांचे नाव आल्यामुळे टीका झाली होती. पहिल्या खातेवाटपामध्ये कृषीमंत्रीपद अब्दुल सत्तार यांना दिल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रीपदावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

पावसाळी अधिवेशनात राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीवर चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी सत्तार यांच्या मंत्रीपदावर आश्चर्य व्यक्त केले. त्याशिवाय सरकारवर ताशेरे ओढले. ‘आज १८ ऑगस्टला धरणे पूर्ण भरली आहेत. मोठा पाऊस आला, तर पाणी वाहून जाण्यासाठी धरणातले पाणी, पाणलोट क्षेत्रातले पाणी एकत्र होईल, तेव्हा नदीकाठच्या सर्व गावांना, शहरांना धोका निर्माण होईल. त्यामुळे रात्रीच्या वेळी धरणावर अधिकारी असलेच पाहिजेत. पाऊस सुरू झाला आणि धरणावर दरवाजे कमी-अधिक उघडण्यात खालच्या अधिकाऱ्यांनी काही चूक केली, तर त्याची किंमत महाराष्ट्रातल्या खालच्या भागातल्या गावांना मोजावी लागेल’, असेही पवार म्हणाले.