कर्नाटक सीमाप्रश्न धगधगत असताना शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील प्रचारापासून दूर – संजय राऊत यांची टीका
बेळगाव, ६ मे २०२३: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेलो पोहोचलेला असताना त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागात भाजपवर टीका करण्याची संधी ठाकरे गटाने सोडलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी प्रचार करता भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराकडे झालेले दुर्लक्ष तसेच सीमावादावर नेमण्यात आलेले समन्वयक मंत्री सीमाभागात फिरकले नसल्याने खासदार संजय राऊत यांनी कडाडून हल्ला चढवला आहे.
समन्वय समितीमधील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई सीमाभागात फिरकले नसल्याने अत्यंत शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी ट्विट करून या दोन्ही मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची सीमा भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्त केली आहे. या भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत असताना हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले देखील नाहीत. इतिहासात त्याची नोंद राहील. तसेच शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा फोटो ट्विट करून ते हरवले आहेत, असे त्यामध्ये लिहिले आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी बेळगाव दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी सभा घेतल्या होत्या. समितीच्या विरोधात प्रचार करत असल्याने त्यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली करत असल्याची टीका केली होती.
सीमा भागामध्ये महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून होत असलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचारामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून विरोध करण्यात येत आहे. समितीकडून महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांना सीमाभागामध्ये प्रचारासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, भाजपकडून एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला देवेंद्र फडणवीस यांना सामोरे जावे लागले आहे. फडणवीस बेळगावमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. तसेच धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सीमाभागामध्ये प्रचार करणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. त्यामुळे मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न नाही ना? अशी भावना त्यांच्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमधून उमटू लागली आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप