पप्पी प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वे शांत का? संजय राऊतांचा सवाल
दिल्ली, १४ मार्च २०२३ : मुख्यमंत्र्यांसोबत जन आशीर्वाद यात्रेत आमदार प्रकाश सुर्वे आणि महिला पदाधिकारी शितल म्हात्रे यांचा पप्पी घेतानाचा माॅर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. या वादात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडी घेत “बदनामी केवळ महिलेची होत नाही तर पुरुषाची देखील होते, या प्रकरणात सुर्वे का शांत आहेत” असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.“
शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अनेक तरुणांना अटक केली जात आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. हा काद्याचा गैरवापर आहे. मी दिल्लीत असल्याने ते प्रकरण नेमंक काय आहे, हे मला माहिती नाही. पण जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी तपासलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांची काही तक्रार आहे का? हे तपासणं गरजेचं आहे. कारण सर्व प्रकरणात त्यांचीही बदनामी झाली आहे. बदनामी ही फक्त महिलांचीच होते, असं नाही. पण हे घडत असताना ते नेमके कुठं आहेत? ते शांत का आहेत?”, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.
“शिंदे गटाच्या नेत्या म्हणतात, की त्यांची बदनामी सुरू आहे. जर त्यांची बदनामी होत असेल तर नक्कीच त्यांनी तक्रार दाखल करावी, पण एक व्हिडीओ व्हायरल होतो, लाखो लोकांपर्यंत पोहोचतो, मग या सर्वांवरच सरकार कारवाई करणार का? आणि अशा प्रकारे रोज महाराष्ट्रात कितीतरी प्रकरणं घडत असतात, त्याच्यासाठीही एसआयटी स्थापन करणार का?” असेही ते म्हणाले.
“कोणत्याही महिलेची बदनामी होऊ नये, त्यांचे शोषण होऊ नये, या मताचा मी आहे. सरकार कोणाचंही असो, महिलांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. पण काही गोष्टी राजकारण आणि सुड घेण्यासाठी केल्या जात असतील. तर त्याला राजकीय कृतीने उत्तर दिलं जाऊ शकतं”, असा इशाराही त्यांनी दिला.