शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल

दहिसर, १२ मार्च २०२३: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दिली आहे. रविवारी रात्री उशीरा शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. आपला हा खोटा व्हिडीओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीच व्हायरल केल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे  आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे मध्यरात्री कार्यकर्त्यांसह दहिसर पोलीस स्टेशमघ्ये पोहचले. शितल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फिंग करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. शुक्रवारी झालेल्या रॅलीतला हा व्हिडीओ होता जो एडिट करुन अश्लील करण्यात आला होता.

फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजसह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी तो व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यानंतर यावर संताप व्यक्त करत शीतल म्हात्रे आणि सुर्वे समर्थकानी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करीत आहे.

या प्रकारावर शीतल म्हात्रे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “आज मी सुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहिण आहे. विरोधकांच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे दिसून येतंय. हा व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.”

शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरुनही आपलं मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या की, “राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा  मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”

राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा माॅर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? असे ट्विट केले आहे.